इरई नदीचे खोलीकरण केवळ फार्स ठरू नये, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रशासनाच्या कामावर व्यक्त केली शंका

◼️इरई नदीचे खोलीकरण केवळ फार्स ठरू नये..

◼️खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रशासनाच्या कामावर व्यक्त केली शंका..



चंद्रपूर : इरई नदी ही चंद्रपूर शहराची जीवनदायिनी आहे. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही नदी सद्यस्थितीत मरणासन्न अवस्थेत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या नदीच्या खोलीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. ही बाब निश्चितच अभिनंदनीय आहे. मात्र, आजपर्यंत पार पडलेले चार अभियान अपयशी ठरले आहेत. त्याप्रमाणे हे अभियानसुद्धा केवळ फार्स ठरू नये, अशी शंका खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केली आहे.

इरई नदी ही चंद्रपूर शहराला ९ किलोमीटर समांतर वाहते. त्यानंतर पुढे ही नदी १७ किलोमीटर अंतरावर वर्धा नदीला जाऊन मिळते. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र, वेकोलिच्या खाणीतील ओव्हरबर्डनमुळे नदीचे पात्र उथळ झाले आहे. नदी पात्रात झाडे झुडपे वाढली आहेत. त्यामुळे या नदीच्या खोलीकरणाचे अभियान २०१५ मध्ये जिल्हा प्रशासनाच्यावतीने पहिल्यांदा राबविण्यात आले. त्यानंतर तीनवेळा हे अभियान राबविण्यात आले. कोट्यवधींचा निधी खर्च झाला. परंतु, नदीचे खोलीकरण, सौंदर्यीकरण झाले नाही. आता पुन्हा प्रशासनाने खोलीकरण अभियान सुरू केले आहे. लोकसहभागातून हे अभियान ४५ दिवस राबविण्यात येणार असल्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी जाहीर केले आहे. त्यानंतरही महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने या कामासाठी यंत्रसामग्रीसाठी निविदा मागविल्या आहेत. त्यामुळे हे अभियान लोकसहभागातून आहे की जिल्हा प्रशासनाकडून हा सर्वसामान्यांना प्रश्न पडला आहे. जिल्हा प्रशासनाने हे अभियान केवळ प्रसिद्धीसाठी इव्हेंट करू नये. प्रत्यक्षात नदीचे खोलीकरण होऊन नदीचे पुनरूज्जीवन व्हावे, अशी प्रत्येक चंद्रपूरकरांची अपेक्षा असल्याचेही खासदार धानोरकर म्हणाल्या.

वाळू चोरट्यांचे काय...


जिल्हा प्रशासनाने इरई नदी खोलीकरणाचे अभियान धुमधडाक्यात सुरू केले आहे. तर, दुसरीकडे वाळूतस्करांनी नदीला अक्षरशः पोखरून काढले आहे. शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या नदीचा ओरबडले जात असताना अधिकाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार येऊ नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यातून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय वाळूचोरट्यांची हिमत वाढली नसावी, अशीही शंका या निमित्ताने येते. त्यामुळे प्रशासनाने खोलीकरणाच्या कामासोबत नदीला ओरबडणाऱ्या वाळूतस्करांवर कारवाई करावी, अशीही मागणी खासदार धानोरकर यांनी केली आहे.
Previous Post Next Post