खासदार प्रतिभा धानोरकर यांचा वरोरा तालुक्यात विकासाचा झंझावात; ४ कोटींच्या २० कामांचे भूमीपूजन संपन्न

⚫ खासदार प्रतिभा धानोरकर यांचा वरोरा तालुक्यात विकासाचा झंझावात;
४ कोटींच्या २० कामांचे भूमीपूजन संपन्न


चंद्रपूर : वरोरा तालुक्याच्या ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी आणि प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज, मंगळवार १७ फेब्रुवारी रोजी तालुक्यात झंझावाती दौरा केला. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेल्या खासदार महोदयांच्या हस्ते एकाच दिवशी तब्बल २० मोठ्या विकासकामांचे भूमीपूजन उत्साहात संपन्न झाले. सुमारे ४ कोटींहून अधिक निधीच्या या कामांमुळे तालुक्याच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून, या दौऱ्याने ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.



या दौऱ्यांतर्गत ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. एकाजुर्ना, चिनोरा, कोंढाळा, आष्टी, वडगाव, दिंदोडा, बोरी आणि पांढुर्णी या गावांमध्ये नवीन अंगणवाडी केंद्रांच्या इमारतींचे भूमीपूजन करण्यात आले. तसेच केम आणि उमरी नाईक येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यात येणार असून, यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय दूर होऊन त्यांना आधुनिक आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.



दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या रस्ते विकासासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये जामणी-फत्तापूर रोड खडीकरण (५० लक्ष), सोनेगाव-गुंजाळा रस्ता मजबुतीकरण (४० लक्ष) आणि मोखाळा ते आल्फर केम जोड रस्ता (७५ लक्ष) यांसारख्या कामांचा समावेश आहे. तसेच चिनोरा (पारधी टोला) येथे सिमेंट रस्ते, नाली व पुलाच्या कामांमुळे अनेक वर्षांचा दळणवळणाचा प्रश्न सुटणार आहे. वडकेश्वर तीर्थक्षेत्र येथे ३० लक्ष रुपये खर्चाच्या संरक्षण भिंतीचे कामही यावेळी सुरू करण्यात आले.



खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हा वार्षिक योजना, पारधी विकास कार्यक्रम आणि तीर्थक्षेत्र विकास निधीतून कोट्यवधींचा निधी मंजूर करून आणल्याने या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. या दौऱ्या प्रसंगी वरोरा तालुका काँग्रेस अध्यक्ष मिलिंद भोयर, वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजू चिकटे, उपविभागीय अभियंता मोहन खराटे, प्रमोद मगरे, शाखा अभियंता डंभारे, सुमठाना सरपंच शुभांगी दातारकर, लक्ष्मण चिंचोलकर, मनोज चिंचोलकर, एकार्जुना सरपंच उज्वला थेरे, रवी भोयर, दिवाकर निखाडे, आशी सरपंच जयमाला भोयर, संजय आसेकर,साहेबराव ठाकरे,वनकर मॅडम, पिपळकर मॅडम यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, गावकरी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Previous Post Next Post