BLO समस्येवर शिक्षक संघटनांची विजय वडेट्टीवार यांच्याकडे धाव
निवेदनाची तात्काळ दखल; जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून त्वरित कार्यवाहीच्या सूचना
चंद्रपूर : वाढत्या BLO (बूथ लेव्हल ऑफिसर) कामकाजामुळे निर्माण झालेल्या अडचणी तसेच इतर विविध शैक्षणिक समस्यांबाबत शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते तथा काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
यावेळी शिक्षक प्रतिनिधींनी BLO कामकाजाचा वाढता ताण, शाळांमधील प्रशासकीय अडचणी आणि शिक्षण क्षेत्रातील इतर प्रलंबित प्रश्न मांडले. निवेदनाची तात्काळ दखल घेत आमदार वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी मा. वसुमना पंत यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून संबंधित सर्व समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
चर्चेदरम्यान चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवा राव, माजी अध्यक्ष रामूभैय्या तिवारी, शहर जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष तथा नगरसेविका सौ. चंदाताई वैरागडे, मुख्याध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य नरेंद्र बोबडे आणि प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस हरीश ससनकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदनावर विस्तृत चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी सौ. वैशालीताई चंदनखेडे (झोन सभापती, मनपा), नगरसेवक सचिन कत्याल, सफिया तवांगर खान, गजानन डोईफोडे, कुणाल चहारे आणि राजू वासेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
शिक्षक संघटनांच्या मते, BLO संदर्भातील वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे अध्यापन कार्यावर परिणाम होत असून शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. आमदार वडेट्टीवार यांनीही शिक्षकांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देत प्रशासनाकडून लवकरात लवकर योग्य तो तोडगा काढला जाईल, असा विश्वास व्यक्त केला.



