खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या जनता दरबारात ग्रामस्थांच्या तक्रारींचे निवारण

◼️खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या जनता दरबारात ग्रामस्थांच्या तक्रारींचे निवारण



चंद्रपूर : खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मूल आणि पोंभुर्णा येथे आयोजित केलेल्या जनता दरबारात नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारी ऐकून घेतल्या आणि त्यांचे त्वरित निवारण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

मूल येथील जनता दरबारात काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत, माजी आमदार देवराव भांडेकर, उपविभागीय अधिकारी अजय चरडे, तहसीलदार मृदुला मोरे, नगरपरिषद मुख्याधिकारी संदीप डोडे, गटविकास अधिकारी राठोड, काँग्रेस नेते राकेश रत्नावार, तालुका अध्यक्ष गुरुदास गुरनुले, महिला तालुका अध्यक्ष रुपाली संतोषवार, शहर अध्यक्ष सुरेश शेरकी, नलिनी आरपवार, माजी सभापती घनश्याम येनूरकर यासह सरपंच व ग्रामस्थांची उपस्थिती होती.   


मूल येथील जनता दरबारात गटविकास अधिकारी हे पक्षपात करत असल्याच्या आरोप उपस्थित ग्रामस्थांनी केला. उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे बघून ग्रामस्थांनी त्यांना धारेवर धरले. त्यासोबतच नागरिकांनी रस्ते, पाणीपुरवठा, वीज आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीमधील अडचणींसंबंधी आपल्या तक्रारी मांडल्या. खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी प्रत्येक तक्रारदाराचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि तातडीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना समस्यांचे निराकरण करण्याच्या सूचना दिल्या. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांवर तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. कुठल्याही अधिकाऱ्यांनी नागरिकांचे पक्षपात न करता काम करण्याच्या सूचना खासदार धानोरकर यांनी अधिकाऱ्यांना केल्या. 


पोंभुर्णा येथे झालेल्या जनता दरबारात ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत, उपविभागीय अधिकारी माने, तहसीलदार रेखा वाणी, गटविकास अधिकारी विवेक बेलालवार, वासुदेव पाल, काँग्रेस नेते मोघरकर यांची उपस्थिती होती. 

ग्रामस्थांनी विशेषतः वन विभागाशी संबंधित समस्या, जमिनीच्या नोंदी आणि सामाजिक सुरक्षा योजनांमधील अडचणी मांडल्या. खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी या समस्यांची गांभीर्याने दखल घेतली आणि वन विभाग तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य तोडगा काढण्याचे निर्देश दिले. तालुक्यातील १५ गावातील पाणीप्रश्न सोडविण्यावर तात्काळ तोडगा निघाला. खासदार धानोरकर यांनी अधिकाऱ्यांना नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याचे आणि त्यांना वेळेत न्याय मिळवून देण्याचे आवाहन केले.


या जनता दरबारांमधील नागरिकांशी संवाद साधताना खासदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या, "जनता दरबार हे नागरिकांच्या समस्या थेट माझ्यापर्यंत पोहोचवण्याचे आणि त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे एक महत्त्वाचे माध्यम आहे. माझ्या मतदारसंघातील नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील आहे आणि यापुढेही राहील."

या जनता दरबारांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल आणि समस्या सोडवण्याच्या भूमिकेबद्दल नागरिकांनी त्यांचे आभार मानले.
Previous Post Next Post