◼️पहलगाम येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना विशेष विमानाने परत आणा
◼️खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नागरी विमान राज्यमंत्री मुरलीधर मोहोड यांच्याकडे मागणी
चंद्रपूर: काल 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील काही पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या आणि काही नागरिक जखमी झाल्याच्या दुर्दैवी घटनेमुळे महाराष्ट्रात शोक आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. या हल्ल्यात डोंबिवली येथील तीन पर्यटकांचा मृत्यू झाला असून पुण्यातील एक पर्यटक जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. याव्यतिरिक्त, आणखी काही मराठी पर्यटक पहलगाम आणि आसपासच्या परिसरात अडकले असण्याची शक्यता आहे. त्यांना सुखरूप महाराष्ट्रात परत आणण्याकरिता विशेष विमान उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नागरी विमान राज्यमंत्री मुरलीधर मोहोड यांच्याकडे केली आहे.
या पार्श्वभूमीवर, खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच नागरी विमान राज्यमंत्री मुरलीधर मोहोड यांना पत्र लिहून पहलगाम येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील सर्व पर्यटकांची तातडीने माहिती घेण्याची आणि त्यांना विशेष विमानाने महाराष्ट्रात परत आणण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.
खासदारांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, या दुःखद घटनेमुळे महाराष्ट्रातील नागरिक चिंतेत आहेत. त्यामुळे, राज्य शासनाने तातडीने कार्यवाही करून पहलगाम मध्ये अडकलेल्या आपल्या बांधवांना सुरक्षितपणे परत आणणे आवश्यक आहे. राज्य सरकार या मागणीची दखल घेऊन लवकरात लवकर योग्य उपाययोजना करेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
⚫ पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबीयांना केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने आर्थिक मदत करा
⚫ खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र
चंद्रपूर: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दुःख व्यक्त केले आहे. या हल्ल्यात निष्पाप पर्यटकांना जीव गमवावा लागला, ज्यात महाराष्ट्रातील काही नागरिकांचाही समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र दुःखात आहे. "या हल्ल्यातील पीडित कुटुंबीयांना केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने आर्थिक मदत करण्याची मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली आहे.
खासदार धानोरकर यांनी या अमानुष हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, केंद्र सरकारकडे तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, "दहशतवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्यामुळे देशातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन या हल्ल्यामागे असलेल्या दोषींना शोधून काढले पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे."
त्यांनी पुढे सांगितले की, "या हल्ल्यातील पीडित कुटुंबीयांना केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने आर्थिक मदत आणि आवश्यक ती सर्व मदत पुरवावी. तसेच, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे."
खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी या संदर्भात केंद्र सरकारला पत्रव्यवहार करणार असल्याचेही सांगितले. त्यांनी या दुःखाच्या प्रसंगी पीडित कुटुंबांच्या दुःखात सहभागी असल्याचे म्हटले आहे.
Tags
Chandrapur