*कोळशावर आधारित २० हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल खासदार, आमदार धानोरकर दाम्पत्यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार*
*टेक्सटाईल पार्कच्या प्रस्तावाला वेग देण्याची मागणी*
*MPSC पूर्वीप्रमाणेच ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने घेणे, वन्यप्राणी बंदोबस्त, विविध विभागातील रिक्त जागा भरण्याचीही केली मागणी*
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा उद्योगावर आधारित हायड्रोजन, मिथेनॉल, अमोनिया तयार करण्याचा 20 हजार कोटीचा प्रकल्प भद्रावती येथे मंजूर करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात केली. यामुळे दहा हजार युवकांना रोजगार मिळणार आहे. त्यासोबतच या भागात टेक्सटाईल पार्क उभारला गेल्यास सदर उद्योगामूळे अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध होईल टेक्सटाईल पार्क वर आधारीत उद्योगांना देखील चालना मिळेल व सदर उद्योग हा विदर्भाच्या आर्थीक उन्नतीत भर घालणारा असेल. तरी टेक्सटाईल पार्क उभारण्या संदर्भाने तात्काळ निर्णय घेऊन प्रस्ताव केंद्र सरकार ला सादर करण्यात यावा. तसेच MPSC पूर्वीप्रमाणेच ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने घेणे, वन्यप्राणी बंदोबस्त, विविध विभागातील रिक्त जागा भरण्याचीही मागणी आज धानोरकर दाम्पत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. आज नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानभवन येथे खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी मानस धानोरकर व पार्थ धानोरकर यांची देखील उपस्थिती होती.
चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भातील यवतमाळ जिल्हा पांढऱ्या सोन्याची खाण म्हणून ओळखला जाणारा जिल्हा आहे. त्याच बरोबर विदर्भातील अनेक जिल्ह्यात कापसाचे पिक मोठ्या प्रमाणात होते. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक जागा, वीज व पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असुन मागील सरकारच्या काळात टेक्सटाईल पार्क उभारण्याच्या संदर्भाने मा. उद्योग मंत्री यांच्याशी चर्चा देखील झाली होती. त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, तथा खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली उद्योजकांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन चंद्रपूर येथे करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी देखील याबाबत केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांचेकडे पाठपुरावा चालवीत केंद्रीय मंत्री नारायण राणे, पियुष गोयल व राज्यातील उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे कडे सातत्याने पत्राचार व बैठक घेऊन प्रयत्न केले. याआधी खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्ह्यात टेक्सटाईल पार्क उभारण्याची मागणी लोकसभेत देखील केली होती. यावर उत्तर देत वस्त्र राज्य मंत्री भारत सरकार यांनी २७ एप्रिल २०२२ ला पत्र क्र. १३ / १ / २०२०, २७ एप्रिल २०२२ अन्वये राज्यांकडून प्राथमिक प्रस्ताव मागविल्याचे कळविले होते.
यासोबतच MPSC च्या विद्यार्थ्यांनी जुन्या सिल्याबस प्रमाणे तयारी केल्याने पूर्वीप्रमाणेच ऑब्जेक्टिव्ह पद्धतीनेच या परीक्षा घेण्यात याव्यात, ताडोबा लगतच्या गावांमध्ये वाघांची दहशत मोठ्या प्रमाणात असून वर्षाकाठी ४०-५० बळी घेणाऱ्या वाघांचा तसेच शेतातील पिके नष्ट करणाऱ्या अन्य वन्य प्राण्यांचा बंदोबस्त त्वरित करावा, राज्य शासनाच्या विविध विभागात रिक्त असलेल्या जागा भरण्यात याव्यात या सर्व मागण्याचे निवेदनही खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.
Tags
Mumbai