मतदार यादीवरील दावे-हरकतींचा आढावा घेण्यासाठी १० सप्टेंबरला चंद्रपूरला येणार विभागीय आयुक्त!

मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्तांचा 10 सप्टेंबर रोजी चंद्रपूर दौरा!

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींच्या अनुषंगाने आढावा!


चंद्रपूर, दि. 9 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विभागीय आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर यांची चंद्रपूर जिल्ह्यासाठी मतदार यादी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती निकाली काढण्याच्या कालावधीत त्यांना जिल्ह्यास तीन भेटी द्यावयाच्या आहेत. त्यानुसार मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त, नागपूर, गुरुवार, दि. 10 सप्टेंबर 2026 रोजी प्रथम भेटीसाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

चंद्रपूर जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली.
या प्रारूप मतदार यादीवर मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त, नागपूर विभाग, यांच्या अध्यक्षतेखाली 10 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता 20 कलमी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीत मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम तसेच प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींच्या प्रक्रियेचा आढावा घेण्यात येणार आहे.

या बैठकीस चंद्रपूर व गडचिरोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार, चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांचे आमदार, जिल्हास्तरीय सर्व मान्यताप्राप्त नोंदणीकृत राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच सर्व मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित राहणार आहेत, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसूमना पंत यांनी कळविले आहे. 


Previous Post Next Post